सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व ICICI फाउंडेशनमध्ये सामंजस्य करार वन्यजीव संरक्षण, जैवविविधता संवर्धन व स्थानिक उपजीविकेला चालना
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड /उंब्रज
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर वन्यजीव विभाग आणि ICICI Foundation for Inclusive Growth यांच्यामध्ये वन्यजीव संरक्षण, अधिवास विकास, जैवविविधता संवर्धन, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक समुदायांच्या उपजीविका विकासासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
हा करार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने क्षेत्रसंचालक श्री. तुषार चव्हाण (आयएफएस) आणि ICICI Foundation च्या वतीने प्रादेशिक प्रमुख श्री. दीपक पाटील यांच्या दरम्यान करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्र तसेच संबंधित वन्यजीव अभयारण्य परिसरात संवर्धन आणि समुदाय विकासाशी निगडित विविध उपक्रम संयुक्तपणे राबविण्यात येणार आहेत.
सदर कराराअंतर्गत वन्यजीव संरक्षण आणि अधिवास विकास, जैवविविधतेचे संवर्धन, जलसंधारण, परिसंस्था पुनर्स्थापना, संशोधन व जनजागृती उपक्रम, समुदाय आधारित निसर्ग पर्यटन, कौशल्य विकास तसेच स्थानिक ग्रामस्थांसाठी शाश्वत उपजीविका निर्मिती यांसारख्या विविध उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या उपक्रमांमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील संवर्धन कार्य अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून स्थानिक समुदायांचा सहभाग वाढण्यासही चालना मिळणार आहे.
या सामंजस्य कराराचा लाभ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि दाजीपूर वन्यजीव अभयारण्य या संपूर्ण परिसंस्थेला होणार आहे. तसेच या परिसरातील नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, ग्रामीण विकास आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

