विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोंदवले येथे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील व्यासपीठ व सुसज्ज वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
By: फिरोज तांबोळी
गोंदवले, :
विकासकामांतून कृणानुबंध जपत अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबीयांनी गोंदवल्याच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील व्यासपीठ व सुसज्ज वाचनालयाच्या इमारतीसाठी वीस लाखाचा निधी मिळवून दिला आहे.माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतेच या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
अकलूजचे मोहिते पाटील व माण तालुक्याचे पूर्वीपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत.गोंदवले बुद्रुकचे कृषितज्ज्ञ कै वसंतराव पाटील यांच्याशी घरोब्याचे संबंध असल्याने गेल्या तीस वर्षांपूर्वी त्यांच्या पुढाकाराने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या नावाने गावात व्यासपीठची भव्य इमारत उभारण्यात आली होती.बाजार पटांगणावर असलेल्या या व्यासपीठावर अनेक लहान मोठे राजकीय,सामाजिक कार्यक्रम पार पडले.परंतु गेल्या काही वर्षात जीर्ण झाल्याने ही इमारत निकामी झाली होती.त्यामुळे ग्रामपंचायतीने ही इमारत पाडून त्याजागी सुसज्ज वाचनालय व भव्य व्यासपीठ उभारण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाला माजी मंत्री विजयसिंह व आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही पाठिंबा देत सहकार्याची भूमिका घेतली.आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतुन यासाठी तात्काळ वीस लाखाचा निधी मंजूरही करण्यात आला.या निधीतून आता दुमजली भव्य इमारत साकारली जाणार आहे.इमारतीच्या खालच्या मजल्यावर व्यासपीठ व वरच्या मजल्यावर सुसज्ज वाचनालय सुरू करण्यात येणार आहे.त्यामुळे सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा असलेल्या गोंदवल्याला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.याशिवाय वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांसाठी वाचनाची पर्वणीच मिळणार आहे.
माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरपंच जयप्रकाश कट्टे यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब माने यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी उपसरपंच संजय माने,सोसायटीचे चेअरमन अभिजीत कट्टे,माजी चेअरमन सूरज पाटील, माजी सरपंच विष्णुपंत कट्टे, गुलाबराव कट्टे,अश्विनी कट्टे,संतोष कट्टे,डॉ विजयकुमार कुलकर्णी,विशाल कदम,डॉ संजय डोंबे,अशोक रणपिसे,बाळासो सोनवणे,ग्रामविकास अधिकारी अमोल पवार,ग्रामपंचायत व सोसायटीचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.