*पंचायत समिती , नगरपंचायत , ग्रामपंचायत सदस्य*   *” आमदार ” होणेसाठी नवीन मतदार संघ निर्माण करा .* *सादिक खाटीक यांचे आवाहन .*

बातमी Share करा:

आटपाडी ; (प्रतिनिधी )
                महाराष्ट्रातले ग्रामपंचायत सदस्य , उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, उपसभापती, सभापती आणि नगरपंचायत सदस्य, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येता यावे म्हणून स्वतंत्र मतदार संघ निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. असे आवाहन सादिक खाटीक यांनी केले आहे .
                नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि पंचायत समिती सदस्यांना उद्देशुन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राज्याचे महासचिव आटपाडीचे सादिक खाटीक यांनी विविध दैनिकांशी बोलताना हे आवाहन केले आहे . या महत्वपूर्ण मागणीसाठी विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व सदस्यांनी राज्य सरकारकडे खास आग्रह धरावा अशी अपेक्षाही त्यांनी केली आहे .
                 राज्यात २८००३ ग्रामपंचायती असून त्यामध्ये २ लाख २३ हजार ८५३ इतकी सदस्य संख्या कार्यरत आहे . १ लाख ११ हजार ९२७ महिला सदस्य म्हणून निवडल्या जातात . आणि फक्त एका संख्येने कमी म्हणजे १ लाख ११ हजार ९२६ पुरुष सदस्य  ग्रामपंचायती मध्ये निवडले जातात . राज्यात ३५१ पंचायत समितीमध्ये अंदाजे ३५०० सदस्य आणि १२३ नगरपंचायती मधील अंदाजे १५०० सदस्य आमदारकीच्या या नवीन मतदार संघात ग्रामपंचायत सदस्या समवेत मतदार म्हणून समावेश केले जावेत अशी अपेक्षा सादिक खाटीक यांनी व्यक्त करून राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती आणि पंचायत समिती मधून सर्व सदस्यांनी, या नव्या मागणीच्या समर्थनाचे सर्व संमतीचे ठराव घेऊन ते राज्य सरकारकडे पाठवावेत असे आवाहनही सादिक खाटीक यांनी केले आहे .
                 महानगरपालीका सदस्य, नगरपालीका सदस्य, नगरपरिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्या साठीच्या स्थानीक स्वराज्य संस्था मतदार संघातून आमदार म्हणून विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मतदार संघाची खास व्यवस्था आहे, अशा  मतदार संघातून २२ मान्यवर सदस्य, आमदार म्हणून विधान परिषदेवर निवडले जातात . त्याच धर्तीवर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि नगरपंचायत सदस्य यांच्यामधून विधान परिषदेवर आमदार निवडून जाण्यासाठी नवीन आरक्षित मतदार संघाची निर्मिती होणे महत्वाचे आहे . नगरपंचायतीचे सदस्य, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष यांचा पूर्वीच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात समावेश नसल्यास अशा सर्व नगरपंचायतींचा ही ग्रा.पं आणि पं . सं . सदस्यांसाठीच्या नव्याने मागणी केल्या जात असलेल्या विधानपरिषद आमदारकीच्या नव्या मतदार संघात समावेश केला जावा.
                 राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांचा कोटा रद्द करून यापुढच्या काळात ग्रामपंचायत, पंचायत समिती , नगरपंचायत सदस्या मधून हे १२ आमदार निवडले जावेत म्हणून स्वतंत्र मतदार संघ आरक्षीत करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा,
                 वाडी , वस्ती , खेडे, गाव, समृद्ध झाले तरच तालुका, जिल्हा, राज्य, देश समृद्ध होणार आहे . गावच्या, गणांच्या आणि लहान शहरांच्या कारभाऱ्यांनाही आमदार होता आले तर खऱ्या अर्थाने विकासाचे चक्र मोठी गती घेणार आहे . प्रत्येक गाव ,लहान शहर औद्योगिकीकरणाने सक्षम करताना राज्य शासनाने खास करून प्रत्येक ग्रामपंचायतीला १ ते ५ कोटी रुपये वेगळा विकासनिधी प्रतिवर्षी उपलब्ध करून देणारे नवीन धोरण स्विकारावे. मोठ्या प्रमाणावर सौर उर्जा व पवन उर्जा प्रकल्प राबवून प्रत्येक गाव, खेडे, लहान शहरे आर्थिक दृष्ट्या समृद्ध आणि संपन्न होण्यासाठी शासनाने नवीन धोरण अंमलात आणावे . त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि नगरपंचायत सदस्यांनी अभ्यासू – डोळस बनत गाव शहराच्या विकासासाठी संघटीत व्हावे. असे आवाहनही सादिक खाटीक यांनी केले आहे .

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!