म्हसवड… प्रतिनिधी महाराष्ट्र शासना तर्फे शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या शैक्षणिक व्हिडिओ बनवणे स्पर्धेत क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी म्हसवड शाळेच्या सहशिक्षिका साधना रोहन बनगर दुधाळ यांनी माण तालुक्यात तृतीय क्रमांक पटकाविला.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे शिक्षकासाठी शैक्षणिक व्हिडिओ बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. सदर शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक व प्रेरणादायी तसेच दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्मिती, दृकश्राव्य शैक्षणिक साधनांचा वापर व ओळख म्हणून उपयुक्त ठरणार आहेत. माण तालुक्यातून या स्पर्धेसाठी शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. इयत्ता पहिली व दुसरी, इयत्ता तिसरी व पाचवी, तसेच इयत्ता सहावी व आठवी या गटात साधना दुधाळ यांनी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ बनवल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना तीनही गटात तृतीय क्रमांक देण्यात आला. संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांच्या उपस्थितीत, संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांच्या हस्ते साधना दुधाळ बनगर यांचा संकुलातील सर्व शिक्षकासमवेत सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी साधना दुधाळ यांचे अभिनंदन केले.