व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) श्रीकांत जाधव चाफळ: प्रतिनिधी
चाफळ विभागात डोंगर माथ्यावर असलेल्या वनवासवाडी,कोळेकरवाडी गावानजीक सावांडा नावाच्या शिवारामध्ये भरदिवसा शिवारात गेलेल्या शेतकऱ्यांना गव्यांचे दर्शन झाले.१५ ते २० च्या कळपांनी आलेल्या गव्यांनी तुडवातुडवी करत नुकसान केले आहे.
आठवडाभरात झालेल्या वादळी पावसाने शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीस सुरुवात केली आहे. सध्या शेतात शेणखत टाकणे, दगडाच्या ताली रचने,शेतातील कचरा गोळा करणे या प्रकारची विविध कामे चालू आहेत. सध्या कडाक्याच्या उन्हामुळे सकाळी दहाच्या आत व दुपारी चार च्या नंतर लोक शिवारात जाणे पसंत करत आहेत. सकाळी शेत शिवारात कामे करण्यासाठी गेलेल्या लोकांना गव्यांचा कळप दिसून आल्याने शेतकऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.
दिवसाढवळ्या शेत शिवारात गवे संचार करू लागल्याने शेतशिवारात शेतीची मशागतीची कामे कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पठारावर बिनधास्त फिरणाऱ्या गव्यांना ग्रामस्थांनी हुसकावून लावल्याने गव्यांनी आपला मोर्चा गणेश वाडीकडे वळवला आहे. तरी वनविभागाने तातडीने या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कोट: पेरण्या करायच्या कशा?
जंगली श्र्वापदांचा वावर जास्त असल्याने पिके घेतली तर त्यातून किती उत्पन्न मिळेल ते सांगता येत नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके घ्यायची की नाही या विवंचनेत शेतकरी आहे. प्रकाश कोळेकर ग्रामस्थ कोळेकर वाडी