रस्ता निकृष्ट कामामुळे अपघात; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
कुलदीप मोहिते
कराड, : (प्रतिनिधी)

राज्यमार्ग क्रमांक १४३ मल्हारपेठ ते पंढरपूर या मार्गावरील अपुऱ्या व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे झालेल्या भीषण अपघातानंतर संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कराड उत्तरचे तालुकाप्रमुख संजय (भैय्या) गुलाबराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली मसूर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर राज्यमार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे चुकवताना सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता महिलांच्या अॅपे रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून सात महिला जखमी झाल्या आहेत.

यापूर्वीही बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार कंपनी ‘सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर’ यांना अनेक वेळा निवेदने देऊन सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, निकृष्ट दर्जाच्या कामाची गुणवत्ता तपासणी करावी, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, तसेच अपघातासाठी जबाबदार धरून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास १ मे रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून, त्याची सर्व जबाबदारी संबंधित ठेकेदार व प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *