म्हसवड – पुळकोटी रस्त्यावरील माणगंगा नदीवरील पुलाच्या दुरवस्थेवरून अपघातांचा धोका, इंजि. सुनील पोरे यांची ग्रामविकास मंत्र्याकडे लेखी मागणी
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
म्हसवड – पुळकोटी रस्त्यावरील माणगंगा नदीवर असलेला पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून त्याच्या पृष्ठभागावरील स्लॅबची सळई उघडी पडली आहे. यामुळे वाहनांचे टायर वारंवार पंचर होत असून अनेक अपघात घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर इंजि. सुनील श्रीधर पोरे (जिल्हाध्यक्ष, नामदेव समाजोन्नती परिषद सातारा) यांनी थेट ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्याकडे 06 जून 2025 रोजी लेखी निवेदन देत या पुलाचे तात्काळ काँक्रीटीकरण करण्याची मागणी केली आहे.
सदर पुलाच्या दुरवस्थेची माहिती संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली असूनही टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
इंजि. पोरे यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सातारा, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दहिवडी यांनाही प्रत पाठवून त्वरित उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
पुलाच्या दुरवस्थेवर वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.