प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
मुंबई, :
केंद्र शासनाच्या वतीने सन 2023 साठी जाहीर झालेला पद्मविभूषण पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना आज त्यांच्या निवासस्थानी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. ‘माझ्या कलेच्या माध्यमातून केलेल्या सेवेची दाखल घेतली, मी कृतज्ञ आहे ‘ अशी भावना यावेळी उस्ताद झाकीर हुसेन यांनी व्यक्त केली. मानपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरूप असून केंद्र सरकारच्यावतीने राज्याच्या अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. देशाच्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पद्म पुररस्कारांचे वितरण होते. मात्र, परदेशी असल्यामुळे उस्ताद झाकीर हुसेन त्या समारंभास उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे आज अपर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी मुंबईतील उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री सचिवालयाचे सहसचिव कैलास बिलोणीकर आणि व्यंकटेश भट, अवर सचिव सुधीर शास्त्री तसेच उस्ताद झाकीर हुसेन यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
अतिशय सविनय आणि कृतज्ञतापूर्वक या पुरस्काराचा स्वीकार करत असल्याची भावना उस्ताद झाकीर हुसेन यांनी यावेळी व्यक्त केली. ‘महाराष्ट्र आणि देशासाठी कलेच्या माध्यमातून काही करु शकलो. त्याची सर्वांनी दखल घेतली. त्यासाठी मी कृतज्ञ आहे’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“आपल्यासारख्या जागतिक कीर्तीच्या कलावंतांचा सन्मान करण्याचा हा क्षण आमच्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे”, अशी भावना अपर मुख्य सचिव (गृह) श्रीमती सौनिक यांनी यावेळी व्यक्त केली.
सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने बांबूची कलाकृती आणि त्यावर फडकणारा तिरंगा उस्ताद झाकीर हुसेन यांना सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी भेट दिला.