शिवजयंतीनिमित्त सरसेनापती संताजी घोरपडे समाधी स्थळी वक्तृत्व स्पर्धेचा जल्लोषपूर्ण बक्षीस वितरण सोहळा संपन्न
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड :-प्रतिनिधी
माण तालुक्यातील ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सरसेनापती संताजी घोरपडे समाधी स्थळ परिसरात शिवजयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. शिवकालीन पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या पावन भूमीवर तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने इतिहासाला शब्दरूप दिले आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या समारंभाला मा. ना. महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे कौतुक करत त्यांनी अशा उपक्रमांमधून नेतृत्वगुण, विचारांची स्पष्टता आणि राष्ट्रभक्तीची जाणीव वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या स्पर्धेत लहान आणि मोठ्या अशा दोन्ही गटांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. लहान गटात जि. प. शाळा करणेवाडीची राजनंदिनी विठ्ठल पडळ हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर श्रीपालवण येथील अबोली किरण ढेंबरे हिने द्वितीय आणि कारखेल येथील अर्चना देवा चोरमले हिने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पुरस्कार पायल लक्ष्मण ढेंबरे हिला प्रदान करण्यात आला. मोठ्या गटात दहिवडी कॉलेजची शिवांजली जनार्दन गायकवाड प्रथम, पिंपरी येथील हनुमान विद्यालयाची आरती कांताराम तरंगे द्वितीय आणि वीर संताजी घोरपडे विद्यालय कारखेलची यशश्री देव पांडुरंग चोरमले तृतीय ठरली. शीतल सतीश खरमाटे हिला उत्तेजनार्थ सन्मान देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान मान्यवर वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राष्ट्रनिर्माणातील अद्वितीय कार्याचा गौरव केला आणि सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रमशाली जीवनगाथेची उजळणी केली. या ऐतिहासिक समाधी स्थळाचे जतन आणि सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
शिवप्रेरणा – सरसेनापती संताजी घोरपडे शिवजयंती उत्सव समिती, माणचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सोहम शिर्के यांनी सांगितले की, ही शिवजयंती साजरी करण्याचे पहिलेच वर्ष असून समाधी स्थळाचा सर्वांगीण विकास पूर्ण होईपर्यंत हा लढा अखंड सुरू राहील.
कार्यक्रमाला नागरिक, युवक-युवती, महिला आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषणांनी दुमदुमून गेला आणि हा सोहळा माण तालुक्याच्या सांस्कृतिक जीवनात एक संस्मरणीय ठसा उमटवून गेला.

