म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी! दरोड्याचा अवघ्या ४ तासांत छडा — “बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ” पुरस्काराने सन्मान
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड : प्रतिनिधी
म्हसवड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम आणि झपाट्याच्या तपासामुळे एक गंभीर दरोड्याचा गुन्हा केवळ ४ तासांत उघडकीस आणण्यात यश आले. या उल्लेखनीय तपासासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते “बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ” या सन्मानाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या चमूचा गौरव करण्यात आला.
गुन्हा क्रमांक 106/25 अन्वये तक्रार नोंदवली होती की, ६ ते ७ अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलवरून येऊन तक्रारदारास बंदूक, तलवार, लोखंडी रॉड आणि कोयत्याचा धाक दाखवून सुमारे ५ लाख १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली.
तपासाच्या दरम्यान, २५ हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आणि आधीच्या गुन्ह्यांतील संशयितांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यात आली. या सखोल तपासातून अवघ्या काही तासांत सर्व ७ आरोपींना अटक करण्यात आली आणि चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले.
या यशस्वी कामगिरीने संपूर्ण जिल्ह्यात पोलीस दलाचा लौकिक उंचावला असून, म्हसवड पोलीस स्टेशनने अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे.