सोलापूरकरांसाठी दिवाळीपूर्वी दिलासा! १० हजारांची आर्थिक मदत आणि मोफत दिवाळी किट – पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांना यश
व्हिजन २४ तास न्यूज संपादक : अहमद मुल्ला
अदनान कल्यानी
सोलापूर, (प्रतिनिधी) –
सप्टेंबरमधील भीषण अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांचे जगणे अक्षरशः विस्कळीत झाले होते. शेतातले पीक वाहून गेले, घरांमध्ये चिखल साचला, आणि हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. परंतु, याच संकटकाळात सोलापूरकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना दिलासा देणारे ठरले – जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे.
त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने पूरग्रस्तांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत तातडीने वितरित केली. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले दिवाळी किट देखील नागरिकांच्या घरपोच करण्यात आले. त्यामुळे या वर्षी अनेक शेतकरी आणि श्रमिक वर्गाने “संकटातही उजळलेली दिवाळी” साजरी केली आहे.
संकटात आधार, कृतीत संवेदनशीलता
११ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर सोलापूर शहर व परिसरात पाणी साचून अनेक वस्त्यांत जनजीवन ठप्प झाले होते. शेतकऱ्यांचे पीक नष्ट, जनावरे मृत, तर कष्टकरी वर्गाचा उपजीविका मार्ग बंद झाला होता. याच वेळी पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि मदत कार्याचा धडाका सुरू केला.
विरोधकांकडून “ही मदत दिवाळीपर्यंतही पोहोचणार नाही” अशी टीका झाली होती. मात्र गोरे यांनी प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवत राज्यस्तरावर या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि अखेर दिवाळीच्या आतच मदतीचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले.
‘फोटो नाही, फक्त काम!’ – गोरे यांची विनम्र भूमिका
मदत किटवर पालकमंत्र्यांचा फोटो छापावा अशी सूचना काही अधिकाऱ्यांकडून व पक्षातील नेत्यांकडून आली होती. मात्र, जयकुमार गोरे यांनी ती सूचना फेटाळून लावत सांगितले —
“हे जनतेचे पैसे आहेत, प्रसिद्धी नव्हे तर सेवा महत्त्वाची आहे. संकटात असणाऱ्या लोकांपर्यंत मदत पोहोचवणे हाच माझा खरा सन्मान.”
त्यांच्या या साधेपणाने व कामकाजातील पारदर्शकतेमुळे नागरिकांमध्ये गोरे यांच्या नेतृत्वाचे कौतुक होत आहे.
दिवाळीपूर्वीच घराघरात उजेड
जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात आलेल्या दिवाळी किटमध्ये धान्य, तेल, साखर, कपडे व आवश्यक घरगुती वस्तूंचा समावेश होता. शहरी श्रमिकांपासून ते ग्रामीण शेतकरीपर्यंत हजारो कुटुंबांनी या किटचा लाभ घेतला.
सोलापूर शहरातील तिन्ही मतदारसंघांमध्ये मदत पोहोचल्याने नागरिक म्हणत आहेत –
“पालकमंत्री गोरे यांनी दिलेली दिवाळी ही फक्त दिवे नाही, तर आशेचा किरण आहे.”

