बोगस वैद्यकीय व्यवसायिकांना आळा बसण्यासाठी डॉक्टरांच्या रजिस्ट्रेशन व नुतनीकरणाबाबत तपासणी करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
व्हिजन २४ तास न्यूज
BY; Ahmad Mulla
सांगली, :
बोगस वैद्यकीय व्यवसायिकांना आळा बसावा यासाठी आरोग्य विभागाने शहर व ग्रामीण भागातील रूग्णालय व डॉक्टरांच्या रजिस्ट्रेशन व नुतनीकरणाबाबत विहीत नियमानुसार तपासणी करून जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीस अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.
जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. बैठकीस पोलीस उपअधीक्षक तथा समितीचे सदस्य सचिव सुधीर भालेराव, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. अरविंद देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, ग्राहक संघटनेचे डॉ. ज्ञानचंद्र पाटील, सुरेश भोसले यांच्यासह आरोग्य विभाग व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय व्यवसायिकांच्या व्यवसायाबाबत आरोग्य विभागाने मार्गदर्शक पुस्तिका काढावी. या पुस्तिकेचे वाचन ग्रामसभेत करावे आणि याची व्यापक जनजागृती करावी. बोगस डॉक्टरांबाबत दिलेल्या नोटिसांचा खुलासा मागवून तो समितीकडे सादर करावा. बोगस डॉक्टर आढळून आल्यास याबाबतचा पंचनामा करताना पंचनाम्यामध्ये सर्वंकष माहिती देण्यात यावी. पंचनाम्याच्या वेळी पंच म्हणून शासकीय कर्मचारी घ्यावेत. हेअरप्लांटेशन करणाऱ्या लॅब / क्लिनिक यांचे सर्व्हेक्षण करून असे उपचार करणारे मान्यताप्राप्त पदवीधारक आहेत का याबाबतची तपासणी आरोग्य विभागाने करावी. यामध्ये अनाधिकृत प्रकार निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत दिल्या.
बोगस वैद्यकीय व्यवसायांविरूध्द दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. पोलीस तपास सुरू असलेल्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा. अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत दिल्या.या बैठकीत बोगस डॉक्टरांबाबत जनजागृती, उपचारांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, बोगस डॉक्टरांवर कारवाई करिता धडक मोहिमा आदिच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.