व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, प्रतिनिधी:
राष्ट्रपिता डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून म्हसवड येथील मोफत नगर वाचनालयात वाचक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही हा कार्यक्रम वाचनाच्या महत्त्वाला अधोरेखित करण्यासाठी आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक बँकेचे माजी संचालक श्री लक्ष्मण काळे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. त्यांनी डॉ. कलाम यांना आदरांजली वाहून, त्यांचे विचार आणि योगदान यांचा उजाळा दिला. यानंतर वाचनालयाचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना संबोधित केले.
आपल्या भाषणात नितीन भाई दोशी म्हणाले की, “डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे संपूर्ण जगासाठी आदर्श आहेत. त्यांचा विचार तरुण पिढीने आत्मसात करावा यासाठी गेल्या पाच वर्षांपासून वाचनालयात वाचक दिन साजरा करण्यात येत आहे. वाचनालय हे ज्ञानाचे केंद्र आहे आणि यामध्ये लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी, हा आमचा प्रमुख उद्देश आहे.”
कार्यक्रमात लहान मुलांना विशेषरूपाने आमंत्रित करून त्यांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रेरित करण्यात आले. यानंतर वाचनालयाचे अध्यक्ष नितीन भाई दोशी यांनी उपस्थित मुलांना खाऊ वाटप केले.
या प्रसंगी माजी ग्रंथपाल भारत पिसे, शिक्षक नेते सुभाष शेटे, मोकाशी सर, ग्रंथपाल सुनिल राऊत, विपुल होरा, अक्षय धट, सविता राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, असंख्य वाचकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून वाचनाच्या महत्त्वावर चर्चा केली.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला असून वाचनालयाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.