रणजितसिंह देशमुख यांचा महादेवराव जानकर यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड – प्रतिनिधी
माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी सातारा जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी नुकतीच झालेली निवड ही माण-खटाव तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत रणजितसिंह देशमुख (भैय्या) यांचा विशेष सत्कार केला.
यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले, “रणजित भैय्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा मला विश्वास आहे. त्यांनी उद्योग, व्यवसाय आणि नव्या पिढीच्या घडणीत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. सूतगिरणी, साखर कारखाना, तसेच इतर विविध उद्योग प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात विकासाला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या कार्यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे.”
या प्रसंगी सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई, अभय दादा जगताप, मनोज दादा पोळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, शेतकरी व स्थानिक नागरिकांनी हजेरी लावून रणजितसिंह देशमुख यांचे अभिनंदन केले.
सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन महादेव जानकर यांनी रणजितसिंह देशमुखांचा गौरव केला. उपस्थितांनी दीर्घ टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.