वीज कंपनीच्या स्मार्ट मीटर विरोधात राजकुमार डोंबे यांचे आंदोलन – मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :प्रतिनिधी
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत घरांमध्ये बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात आज म्हसवड येथे तीव्र आंदोलन झाले. युवक क्रांती दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजकुमार डोंबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले असून, यावेळी म्हसवड विद्युत कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक अडचणीचे झाले आहे. पूर्वी ज्यांना वीज बिल फक्त ४००-६०० रुपये दरम्यान येत होते, त्यांना आता ८००० ते १२,००० रुपये इतकी भरमसाठ रक्कम भरावी लागत आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व्यक्तींना यामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे.
राजकुमार डोंबे यांनी सांगितले की, “सरकारने गोरगरिबांसाठी धोरणे आखावीत, त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करावा, पण येथे उलट त्यांचे कंबरडे मोडणारे निर्णय घेतले जात आहेत. स्मार्ट मीटर हे अत्यंत खर्चिक व अन्यायकारक आहेत. सरकारने तात्काळ हे मीटर काढून टाकावेत.”
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ सोनवणे, जाविर बापू, महादेव काटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत सांगितले की, जर सरकारने लवकरच सकारात्मक निर्णय घेतला नाही तर जनआंदोलन तीव्र करण्यात येईल.