माण तालुक्यातील तुपेवाडीत धडक छापा! शेतात गांजाची लागवड — पोलिसांनी ४० किलो ओला गांजा जप्त
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी) –
सातारा जिल्हा पोलीस आणि म्हसवड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने माण तालुक्यातील तुपेवाडी (ता. माण) येथे अवैध गांजा लागवडीवर मोठी कारवाई करत शेतातून तब्बल ४० किलो ओला गांजा जप्त केला आहे. या गांजाची बाजारभावानुसार किंमत सुमारे १० लाख ११ हजार ९५० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वरकुटे (ता. माण) येथील शहाजी दाजी तुपे यांच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना त्यांच्या विशेष बातमीदारांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि म्हसवड पोलीस स्टेशनचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले.
सदर ठिकाणी धडक छापा टाकत पोलिसांनी शेतातील हिरवट गांजाची झाडे, फुले, पाने, बीज आणि ओलसर काड्या यांसह एकूण ४० किलो गांजा जप्त केला.
या कारवाईसाठी पोउनि विश्वास शिंगाडे, सपोनि अक्षय सोनावणे, रोहित फार्णे, अनिल वाघमोडे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अन्य अंमलदार व फॉरेन्सिक टीम उपस्थित होती.
या छाप्याबाबत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पथकाचे कौतुक करत म्हटले की —
“अवैध औषधांच्या उत्पादन व विक्रीविरुद्ध सातारा जिल्हा पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. कोणताही गुन्हेगार सुटणार नाही. अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहील.”
या छाप्यामुळे स्थानिक परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणाद्वारे जनतेला स्पष्ट संदेश दिला आहे की —
👉 “गांजा पेरल्यास किंवा अवैध व्यापार केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.”

