गुणवंत विद्यार्थी हीच क्रांतिवीर संकुलाची संपत्ती…….सुलोचना बाबर
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड …प्रतिनिधी
गुणवंत विद्यार्थी हीच क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड ची खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवडच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी म्हसवड येथे केले.
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवडचा माजी विद्यार्थी विजय हरिदास माने यांची राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार संकुलात आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते.
यावेळी बोलता सुलोचना बाबर म्हणाल्या गत पंचवीस वर्षात क्रांतीवीर शाळेने सर्व गुणसंपन्न हजारो विद्यार्थी घडविले. सुरुवातीच्या बॅचच्या अनेक विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यापैकी अनेक विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यापैकीच एक विद्यार्थी विजय हरिदास माने याची नुकतीच राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक पदी निवड झाली असून खऱ्या अर्थाने हा क्रांतिवीर संकुलाचा बहुमान आहे. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे.
यावेळी बोलताना सत्कारमूर्ती विजय माने म्हणाले क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या बालवाडी स्तरामध्येच माझ्या शैक्षणिक जीवनाचा पाया मजबूत झाला. याच ठिकाणी प्राथमिक ,माध्यमिक शाखेत माझ्या जीवनाला पैलू पाडण्याचे काम माझ्या गुरुजींनी केले. आज राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मला मिळालेल्या यशाची खरे मानकरी माझे गुरुजन व आई वडील असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आपण कसे घडलो याबाबत तपशीलवार माहिती विजय माने यांनी दिली. शाळेच्या पहिल्या दिवशी बाबर मॅडम यांनी समजावल्याची आठवण सांगताना विजय माने अत्यंत भाऊक झाले. अभ्यासाबरोबरच खेळ व अवांतर वाचनाची आवड जोपासण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल माने यांनी केले. सूत्रसंचालन तुकाराम घाडगे यांनी तर उपस्थितांचे आभार अनिल कुमार काटकर यांनी केले.