लिपिक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘आम आदमी पार्टी’ व ‘अखंड मराठा समाजा’चा जाहीर पाठिंबा ग्रामविकास मंत्र्यांनी अधिवेशनात आवाज उठवावा – सोहम शिर्के
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड :
ग्रामीण प्रशासनाचा कणा असलेल्या ग्रामपंचायत व पंचायत समितीतील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर पाठिंबा मिळू लागला आहे. आणि ‘अखंड मराठा समाजा’च्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे, अशी माहिती अखंड मराठा समाज सेवक, माण–खटाव जनता सेवक तथा सातारा जिल्हा उपाध्यक्ष (आम आदमी पार्टी) सोहम शिर्के यांनी दिली.

सोहम शिर्के यांनी सांगितले की, ग्रामपंचायत व पंचायत समितीतील लिपिक वर्गाच्या वेतनातील त्रुटी दुरुस्ती, पदोन्नतीचे प्रलंबित प्रश्न तसेच इतर सेवा विषयक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या न्याय्य मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले असून, अनेक ठिकाणी प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.
“शासनाच्या विविध योजना घराघरात पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम हेच कर्मचारी करतात. मात्र त्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडत आहेत आणि त्याचा थेट फटका जनतेला बसत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
सध्या महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असताना कर्मचारी रस्त्यावर आंदोलन करत आहेत, ही परिस्थिती योग्य नसल्याचे मत व्यक्त करत सोहम शिर्के म्हणाले,
“एकीकडे कर्मचारी रस्त्यावर आणि दुसरीकडे सरकार सभागृहात — हे चित्र बदलणे आवश्यक आहे.”
यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री यांना आवाहन करत सांगितले की, या विषयावर अधिवेशनात ठोस भूमिका मांडून संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घ्यावी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा.
या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘आम आदमी पार्टी’तर्फे मंत्र्यांना लवकरच लेखी निवेदन देण्यात येणार असून, येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याची ठाम मागणी केली जाणार असल्याचेही सोहम शिर्के यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाजावर या आंदोलनाचा मोठा परिणाम होत असून, शासन या प्रश्नावर कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

