म्हसवडमधील मुस्लिम समाजाचा आमदार जयकुमार गोरे यांना जाहीर पाठिंबा
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
म्हसवड : (प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसवड शहरातील मुस्लिम समाजाने भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मुस्लिम समाजातील बांधवांनी एकमुखी निर्णय घेऊन, जयकुमार गोरे यांच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत त्यांच्या समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्याशी आपली निष्ठा व्यक्त केली.
म्हसवड मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, व सामाजिक उन्नतीसाठी जयकुमार गोरे यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन, मुस्लिम समाजाने त्यांच्या मतांचा बहुमूल्य पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या विविध हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी जयकुमार गोरे कटिबद्ध असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मुस्लिम समाजाच्या या ठाम पाठिंब्यामुळे म्हसवड शहरात जयकुमार गोरे यांना मोठ्या मताधिक्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. लोकांच्या साथीमुळे विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल, अशी भावना गोरे यांनी व्यक्त केली आहे. “मुस्लिम समाजाच्या हितासाठी काम करणे ही माझी जबाबदारी आहे. हा पाठिंबा माझ्यासाठी मोठा विश्वासाचा बळ आहे, आणि मी या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” असे आश्वासन गोरे यांनी दिले.
या ऐतिहासिक बैठकीत म्हसवड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अकीलभाई काझी, विविध पदाधिकारी, मान्यवर, तसेच मुस्लिम समाजाचे अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मुस्लिम कार्यकर्त्यांनी, “आमच्या हिताचे काम करणारा नेता जयकुमार गोरे असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही एकजुटीने काम करणार,” असे स्पष्ट केले.
जयकुमार गोरे यांना मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यामुळे म्हसवडमधील निवडणुकीत त्यांच्या मतांधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. विविध स्तरातून मिळत असलेल्या या पाठिंब्यामुळे त्यांच्या बाजूला मजबूत आधार निर्माण झाला असून आगामी निवडणुकीत त्यांची बाजू अधिक मजबूत झाली आहे.