राज्यातील १२७६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
मुंबई, :
राज्य शासनाने अर्धवेळ पदावरील ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन (रूपांतरण) करण्याचा निर्णय घेतला असून याचा लाभ १२७६ अर्धवेळ ग्रंथपालांना होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व अर्धवेळ ग्रंथपालांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्याची बाब अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. नवीन आकृतीबंधानुसार अर्धवेळ ग्रंथपाल पद हे मृत संवर्ग करण्यात आले असून या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवा ज्येष्ठतेनुसार पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.