उंब्रज महाविद्यालयातील प्राध्यापकावर विनयभंगाचा आरोप; तात्काळ निलंबनाची मागणी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
उंब्रज, ता. कराड (प्रतिनिधी):
उंब्रज येथील मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयात एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवून तिचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने धाडस दाखवत उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या गंभीर प्रकारानंतरही महाविद्यालय प्रशासनाकडून संबंधित प्राध्यापकावर अद्याप कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महाविद्यालय प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात संबंधित प्राध्यापकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच अंतर्गत तक्रार निवारण समिती (ICC) ची तातडीने बैठक बोलावून चौकशी करावी, पीडित विद्यार्थिनीला संरक्षण द्यावे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, असेही नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हा सचिव अमोल सुभाष कांबळे यांनी इशारा देताना सांगितले की, पुढील २४ तासांत योग्य कारवाई न झाल्यास तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीस महाविद्यालय प्रशासन जबाबदार राहील.

दरम्यान, या घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षण संस्थांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *