सराफ व्यावसायिकांसह उंब्रजकरांच्या सुरक्षेला प्राधान्य :-सपोनि पंकज पवार
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते उंब्रज कराड:
अलीकडे घडलेल्या दागिने लुटीच्या घटनेनंतर उंब्रज पोलिसांनी सुरक्षेचा धडाका सुरू केला आहे. सराफ व्यावसायिकांची बैठक घेऊन सुरक्षेबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील काळात विविध व्यावसायिक संघटना तसेच युवक-युवती आणि शाळा-कॉलेज स्तरावरही जनजागृती बैठका घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
२५ फेब्रुवारी रोजी उंब्रज पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत पंकज पवार यांनी स्पष्ट केले की, अलीकडील चोरीची घटना ही पूर्वनियोजित पाळत ठेवून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधिक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू आहे. तांत्रिक व स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे असे त्यांनी सांगितले.
तथापि पोलिसांबरोबरच व्यावसायिकांनीही स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. नाईट व्हिजन सीसीटीव्ही, प्रवेश-निर्गमन बिंदूंवर कॅमेरे, सामाईक वॉचमन, मौल्यवान मालाची सुरक्षित ने-आण, गोपनीयता आणि सायरन प्रणाली यांसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
उंब्रज परिसर अधिक सुरक्षित कसे राहील हा आमचा मुख्य उद्देश आहे. यासाठी व्यापारी, युवक, युवती, शाळा-कॉलेज प्रशासन यांच्याशी समन्वय साधून नियमित बैठका घेण्यात येतील असेही पवार यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे उंब्रजमध्ये सुरक्षाविषयक सजगता वाढण्यास मदत होणार असून पोलिस-नागरिक सहकार्याच्या बळावर गुन्हेगारीला आळा घालण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

