बारावी बोर्ड परीक्षेसाठी म्हसवडमध्ये तयारी पूर्ण – केंद्रावर ५४४ विद्यार्थी परीक्षा देणार :केंद्राध्यक्ष प्रवीण दासरे
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक अहमद मुल्ला )
म्हसवड, दि. ९ फेब्रुवारी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या बारावी (एच.एस.सी.) बोर्ड परीक्षेसाठी सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड या केंद्रावर तयारी पूर्ण झाली आहे. येथील परीक्षा केंद्र क्रमांक १४३ मध्ये विज्ञान शाखेचे ५२५ व एम.सी.व्ही.सी. विभागाचे १९ असे एकूण ५४४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
ही परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार असून केंद्र संचालक म्हणून प्राचार्य प्रवीण उत्तमराव दासरे जबाबदारी सांभाळणार आहेत. परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी स्थानिक नागरिक व दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे, तसेच तालुका व जिल्हा पातळीवरील भरारी पथके देखील तपासणीसाठी भेट देणार आहेत.
परीक्षेचे मुख्य व उपकेंद्र
मुख्य केंद्र सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये १६ खोल्यांमध्ये ४०० विद्यार्थी बसणार आहेत. तर उपकेंद्र म्हणून ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड येथे १४४ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र पेपर मुख्य व उपकेंद्र दोन्ही ठिकाणी घेतले जातील, तर इतर सर्व विषयांचे पेपर मुख्य केंद्रावरच होणार आहेत.
कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा
या परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून श्री. दासरे पी.यु., उपकेंद्र संचालक श्री. ननावरे डी.टी. व श्री. नरळे डी.डी. जबाबदारी सांभाळतील. तसेच सहायक श्री. नलवडे एम.के. व श्री. ओतारी पी.एस. यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक शिस्तीचे नियम लागू करण्यात आले असून, कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवले जाणार आहे.
“विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. कोणत्याही गैरप्रकारास वाव दिला जाणार नाही,” असे केंद्र संचालक श्री. दासरे यांनी सांगितले.