विकासाचा सर्व अनुशेष भरून काढण्यासाठी कोणत्याही संघर्षाला मी सदैव तयार आहे.” प्रभाकर देशमुख, नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्यूज
BY;Ahmad Mulla Mhaswad
महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव ठेवून उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्याचे कृषी आयुक्त, जलसंधारण सचिव, विभागीय आयुक्त यांसह अनेक पदे सांभाळत आदरणीय प्रभाकर देशमुख यांनी महाराष्ट्राला दिशादर्शक योजना देण्याचे काम केले. जलयुक्त शिवार या त्यांच्या योजनेने क्रांती केली अन राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त होण्यास मदत झाली. ग्रामस्वच्छता अभियान, एक दिवस शाळेसाठी यासह अनेक योजना राबवून महाराष्ट्राला एका उंचीवर नेणारा माणदेशी सुपुत्र देशपातळीवर गौरवला जातो, ही माणदेशी जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे. सेवानिवृत्तीनंतर माण व खटाव तालुक्यांच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या या कर्तृत्ववान व जनतेच्या मनातील सक्षम नेतृत्वाच्या कार्याचा वाढदिवसानिमित्त घेतलेला आढावा…..
– प्रा. अनिल बोधे
प्रभाकर देशमुख यांनी लोधवडे येथे जलसंधारण, साखळी सिंमेट बंधारे, वृक्षारोपणासह अनेक कामे करून गाव राज्यात आदर्श बनवले. प्रसिद्ध अभिनेता अमीर खान याने पाणी फाउंडेशनची स्थापना करताना लोधवडे गावचा आदर्श व प्रभाकर देशमुख यांचे मागदर्शन घेऊन राज्यभर काम केले. श्री. देशमुख हे राज्याचे जलसंधारण सचिव असताना महाराष्ट्रात दुष्काळ पडला. त्यावेळी जलसंपदामंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील पाच हजार गावात जलयुक्त शिवार अभियान राबवले गेले. साडेचार हजार गावे पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाली. हजारो गावे टँकरमुक्त झाली. नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम राबवला. मध्य व पश्चिम विभागात कडधान्य उत्पादनात केलेले काम हे देशात सर्वोत्तम ठरले. त्यांना ‘कृषिकर्मण’ हा पुरस्कार देऊन देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह व कृषिमंत्री शरद पवार यांनी गौरवले. राज्यात कीड व रोगनिदान उपक्रम प्रभावीपणे राबवल्याबद्दल व कृषी क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल श्री. देशमुख यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशासनातील सर्वोच्च सेवेसाठीच्या ‘पंतप्रधान पुरस्काराने’ गौरवण्यात आले, पिकांवरील कीड नियंत्रण व सल्ला योजनेत माहिती तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर केल्याबद्दल केंद्र शासनाचा ‘नॅशनल अॅवाॅर्ड फाॅर गव्हर्नन्स’ हा पुरस्कार २०१२ मध्ये देवून ‘सुवर्णपदकाने’ सन्मानित करण्यात आले होते. शेतकर्‍यांचे बचत गट तयार करून विषमुक्त शेती दर्जेदार नैसर्गिक शेती करण्याकडे त्यांनी शेतकऱ्यांना वळवले.
माण-खटाव तालुक्यातील जनतेस फायदा….
प्रभाकर देशमुख यांनी प्रशासकीय सेवेत काम करताना घेतलेल्या धोरणांचा माणदेशी शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. माण व खटाव या दुष्काळी तालुक्यांना त्यांच्या धोरणांमुळे हजारो शेततळी मिळाली, हजारो विहिरी झाल्या, ठिबकला अनुदान मिळाले. जलसंधारण सचिव असल्याने जलयुक्त शिवारमधून पाचशे कोटींच्या वर रुपयांची कामे झाली. ओढ्यांवरील बंधारे, नदीवरील बंधारे, छोटे पाझर तलाव यासह फळबागा लागवड अनुदान या सारख्या अनेक योजना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरल्या. त्यांच्या या कामामुळे आज हजारो हेक्टर उसाचे क्षेत्र माण व खटाव तालुक्यात वाढल्याने साखर कारखानदारीही वाढू लागली आहे. कांदा लागवड क्षेत्र वाढले, डाळिंबाला नवसंजीवनी मिळाली. फळबागा मोठ्या प्रमाणात वाढण्यास श्री. देशमुख यांनी घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरले.
महापुरुषांचा आदर्श…..
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून तसे काम करण्याचा प्रयत्न श्री. देशमुख करत आहेत. कोकणचे आयुक्त असताना रायगड किल्ला संवर्धनाचा विषय त्यांनी उचलून धरला. त्यामुळेच रायगड संवर्धनासाठी सुमारे रुपये ६०० कोटींचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. रायगड ही महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची अस्मिता असल्याने रायगड संवर्धनासाठी त्यांनी अतिशय तळमळीने काम केले. शिवनेरी किल्ला संवर्धनाचा कार्यक्रमही त्यांनीच राबवला होता. कोल्हापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम हा एक हजार ७२८ शाळांमध्ये राबवला. त्यामध्ये मुलांचा बौद्धिक, भावनिक, शारीरिक विकास व सामाजिक जाणीव निर्मिती या माध्यमातून गुणवत्तावाढीचा कार्यक्रम राबवला. त्याचे फलित म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या मेरिटमध्ये ११२ पैकी ७२ मुले कोल्हापूर जिल्हा परिषदेची होती. या कामाची दखल घेवून तत्कालीन पंतप्रधान मोहन सिंग यांच्या हस्ते ‘पंतप्रधान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. पुणे आणि कोकणात कार्यरत असताना दहा हजार शाळांमध्ये ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबवला.
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टेंभू लाभक्षेत्रालगतच्या माण व खटाव तालुक्यातील ४८ गावांमधील १३ हजार  १२६ हेक्टर क्षेत्रासाठी २.५ टी.एम.सी. पाणी आरक्षित केले. आदरणीय खासदार शरद पवार यांनी माण-खटाव मधील जनतेला पाणी देण्याचा शब्द यानिमित्ताने पाळला असून माननीय प्रभाकर देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित आहे. औंधसह सोळा गावांसाठी उरमोडीचे १.२५ टी.एम.सी. पाणी आरक्षित करण्याचे महत्वपूर्ण काम केले. तारळी प्रकल्पांतर्गत पाच गावांना पाणी देण्याबाबत पाठपुरावा करुन ते काम पूर्णत्वास नेले. तसेच माणगंगा वाहती राहण्यासाठी महत्वाची ठरणारी जिहे-कटापूर योजना अंतिम टप्प्यात आणण्यात मोलाची भूमिका बजावली.
माण-खटावच्या विकासाचा ध्यास….
निवृत्तीनंतर आरामात आयुष्य न जगता सर्वसामान्य जनतेत रमणाऱ्या प्रभाकर देशमुख यांनी समाजसेवेचा वसा पुढे चालू ठेवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी स्नेहाचे संबंध असल्याने श्री. शरद पवार साहेब यांनी माण-खटाब राष्ट्रवादीची धुरा प्रभाकर देशमुख यांच्यावर सोपवली. विधानसभा निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता आपले कार्य त्यांनी सुरूच ठेवले. सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन दहिवडी व वडूज नगरपंचायतीमध्ये नेत्रदीपक यश मिळवत सत्ता ताब्यात घेतली. ग्रामपंचायत व विकास सोसायटी निवडणुकांमध्येही घवघवीत यश मिळवले. राजकारण हे समाजसेवेचे माध्यम मानून त्यांनी जनतेच्या हिताची कामे केली. त्यांच्या पत्नी सौ. अनुराधा देशमुख, कन्या हर्षदा देशमुख जाधव यांनी ड्रीम सोशल फाउंडेशन व माणदेश फाउंडेशनमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवले. पाणी फाउंडेशनच्या कामासाठी गावोगावी मोठी मदत केली. त्यामुळे पाणी अडविण्याचे मोठे कार्य उभे राहिले. श्री. देशमुख यांनी ज्येष्ठ समाजसेविका (कै.) सिंधुताई सपकाळ यांचा आश्रम उभारण्यास मोठी केली. प्रभाकर देशमुख यांचे कार्य तरुणांना आदर्शवत व सर्वसामान्य जनतेला आधार देणारे ठरत आहे.
…….

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!