व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) कुलदीप मोहिते उंब्रज, कराड कराड तालुक्यातील उंब्रज परिसरातील हायवे रस्ता लगतचे सेवा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कराड उत्तर तालुकाप्रमुख संजय भोसले यांनी उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
*खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका उंब्रज परिसरातील राष्ट्रीय महामार्ग (N.H. 4) सातारा ते कागल या रस्त्याच्या हद्दीत तसेच सेवा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले असून, नुकतेच बेलवडे येथे अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. या अगोदरही खड्ड्यांमुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत व काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या सर्व घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
*शिवसेनेचा इशारा प्रशासनाने त्वरित खड्डे मुजवले नाहीत तर संबंधित ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली जाईल, असा इशारा संजय भोसले यांनी दिला आहे. यावेळी संभाजीराव घाडगे, शंकरराव घार्गे, दुर्गेश भोसले, पांडुरंग सावंत, संदिप थोरात, सर्जेराव भोसले, महादेव भोंगाळे, सौरभ शिंदे, आदित्य घाडगे, वेदांत नलवडे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.