गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी थेट बस स्थानकात घुसल्याने,पाणी साचून बस स्थानकात दुर्गंधी पसरली आहे. चाफळ बस स्थानकात साचून राहिलेल्या या पाण्याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तसेच साचून राहिलेल्या पाण्यात रस्त्यावरील कचरा ही जमा झाल्याने बस स्थानक आहे की कचरापेटी असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या या गैरसोयीबद्दल सातारा विभाग नियंत्रक कधी लक्ष घालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विभागातील ३५ते ४० गावच्या बाजारपेठेचे चाफळ हे मुख्य केंद्रस्थान आहे.तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, कर्मचारी वर्ग,तसेच पर्यटन स्थळ म्हणून चाफाळ येथील श्रीराम मंदिरास भेट देण्यासाठी येणारे पर्यटक यांची रेलचेल सुरू असते. आणि त्यातच बस स्थानकाची झालेली दुर्दैवी अवस्था. इमारत जीर्ण झाल्याने ती कधी कोसळेल सांगू शकत नाही. आणि त्याचबरोबर परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसाने स्थानकात पाण्याचे तळे तयार होत आहे. त्यामुळे प्रवाशांना या पाण्यातच एसटीची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. बस स्थानकाच्या झालेल्या दयनीय अवस्थेची पाटण आगार प्रमुखांनी केवळ पाहणी केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.मात्र यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे,अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.