हिंदी पखवाडा निमित्त पी.एम.श्री. केंद्रीय विद्यालय नांदेड मध्ये भव्य हिंदी पुस्तक प्रदर्शन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
उद्धव सरोदे
नांदेड (प्रतिनिधी)

हिंदी पखवाडा २०२५ च्या औचित्याने पी.एम.श्री. केंद्रीय विद्यालय, नांदेडच्या वाचनालयात हिंदी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. रंगीबेरंगी सजावट आणि ज्ञानाने उजळलेल्या पुस्तकांच्या रांगांमुळे संपूर्ण वातावरण अभ्यासमय आणि उत्साहवर्धक झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य श्री. अशोक विश्वकर्मा व मुख्याध्यापक श्री. राम श्रृंगारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर ग्रंथगुरू डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. कथा, कविता, कादंबऱ्या, चरित्रग्रंथ, बालसाहित्य, करिअरविषयक पुस्तके, ज्ञानकोश अशा विविध साहित्यप्रकारांनी हे प्रदर्शन समृद्ध झाले होते.

प्राचार्य विश्वकर्मा यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की “पुस्तके म्हणजे ज्ञानाचे अनमोल दालन असून वाचनामुळे विचारविश्व विस्तारते.” तर मुख्याध्यापक श्रृंगारे यांनी “हिंदी साहित्य वाचनाने संस्कृतीशी नाते अधिक घट्ट जोडले जाते” असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालय प्रमुख डॉ. मितेश हनवते यांचे शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. दिवसभर विद्यार्थी विविध पुस्तकांमध्ये रमून गेले आणि शेवटी एकमुखाने मागणी केली की “असे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले पाहिजे.”

या उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन होऊन हा वाचनाचा खरा महोत्सव ठरला.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *