सातारा जिल्ह्यात गोकुळअष्टमी, दहीहंडी व गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये लेझर व बीम लाईट वापरास बंदी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
सातारा : प्रतिनिधी

गोकुळअष्टमी, दहीहंडी, गणेश मूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट आणि प्रेशरमिड या प्रकाशयंत्रांच्या वापरावर सातारा जिल्ह्यात संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजेपासून लागू होऊन ६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे.

पोलीस अधीक्षक तुषार चंद्रकांत दोशी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत हा आदेश काढला आहे. आदेशात नमूद केल्याप्रमाणे, या प्रकाशयंत्रांचा प्रखर प्रकाश आणि कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः श्रवणयंत्र, डोळे आणि हृदयावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. याशिवाय, या यंत्रांचा वापर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष विचलित करून अपघातास कारणीभूत ठरू शकतो. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून विविध उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट व प्रेशरमिड यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या उपकरणांचा अतिरेक टाळण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी ही बंदी आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या आदेशानुसार, सातारा जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती, संस्था, कंपनी, सार्वजनिक मंडळे किंवा गणेश मंडळे तसेच या मिरवणुकीचे आयोजक, संयोजक, वाद्य मालक, चालक, व्यवस्थापक किंवा ताबाधारक यांनी वरील प्रकाशयंत्रांचा वापर करु नये किंवा इतरांकडून करवून घेऊ नये. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

हा आदेश सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, जिल्हाधिकारी, उपविभागीय व कार्यकारी दंडाधिकारी यांना कळविण्यात आला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *