उत्तर माणमधील ३२ गावांना पाणी देण्याचे नियोजन पूर्ण… पुण्यातील कृष्णा खोरे सिंचन भवनात अधिकाऱ्यांबरोबर जिहेकठापूर बाबत बैठक
व्हिजन २४ तास न्युज (संपादक अहमद मुल्ला )
म्हसवड
माण तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे ३२ गावांना जिहेकठापूर योजनेचे पाणी देण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. आंधळी धरणातून पाणी उचलून वंचित गावांना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव मांडून या कामांची मंजूरी घेतली होती. पुणे येथील सिंचन भवनात जलसंपदा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या योजनेची कामे सुरु करण्याबाबत आढावा घेण्यात आला.
बैठकीला जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. धुमाळ,साताऱ्याचे अधिक्षक अभियंता ज. स. शिंदे, सहाय्यक मुख्य अभियंता म. वि. म्याकल, कार्यकारी अभियंता निकम, सहय्यक अभियंता सुतार आणि करांडे उपस्थित होते.
जिहेकठापूर योजनेच्या मूळ आराखड्यात या योजनेद्वारे येणारे पाणी येरळा आणि माणगंगा नदीत सोडण्याचे प्रस्तावित आहे. नद्यांमधील पाणी बंधाऱ्यांमध्ये अडवून ते शेतकऱ्यांना उचलून शेतापर्यंत न्यावे लागणार होते. २०१९ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी सविस्तर प्रस्ताव मांडला होता. या योजनेचे पाणी पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांना देण्याचा आराखडा तयार करण्याच्या सुचना तेव्हा देण्यात आल्या होत्या. माण तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे ३२ गावांना जिहेकठापूर योजनेचे आंधळी धरणात येणारे पाणी उचलून देण्याची वाढीव योजना फडणवीस यांच्याकडे सादर केली होती. राज्याच्या इतिहासात विक्रमी कमी कालावधीत या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडिच वर्षे या योजनेच्या कामांची निविदा रखडविण्यात आली होती. निधी मंजूर होता, केंद्राच्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत समावेश करुन निधी वितरित केला होता, तरीही राजकीय आकसातून निविदा प्रक्रीया थांबवण्यात आली होती.
आता आमचे सरकार येताच वेगाने निविदा प्रक्रिया पूर्ण होवून या योजनेची कामे सुरु होत आहेत. सिंचन भवनात आयोजित बैठकीत या योजनेच्या कामात येणाऱ्या भूसंपादन आणि इतर अडचणींवर चर्चा करुन तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. उत्तर माणच्या ३२ गावांना जिहेकठापूरचे पाणी लवकरात लवकर देण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले.
पुण्यातील सिंचन भवनात कृष्णा खोरे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांमधील बैठक सकाळी ९ वाजता सुरु होवून दुपारी १२ वाजता संपली. बैठकीत जिहेकठापूर वाढीव योजनेच्या रायजिंग मेन, पंप हाऊस, विद्युत विभागासह प्रत्येक कामाचा बारकाईने आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी येणार आहेत.