पंढरपूरकरांना ‘बोगदा वनवास’; रेल्वे पुलाखालचा मुख्य रस्ता २० दिवसांसाठी बंद, नागरिकांची दमछाक
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
अदनान कल्याणी
पंढरपूर (प्रतिनिधी) :
शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांपैकी एक असलेला डीवायएसपी कार्यालयाजवळील रेल्वे पुलाखालचा रस्ता ४ ऑगस्टपासून २५ ऑगस्टपर्यंत, म्हणजे तब्बल २० दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने पुलाखालील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या बंदीमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून वाहतूक कोंडी, पर्यायी मार्गांची अडचण आणि पावसामुळे होणारी दमछाक यामुळे जनतेचा त्रास वाढला आहे.
या रस्त्याचा उपयोग शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये व उपनगरात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. परिणामी हा रस्ता बंद झाल्याने नागरिकांची दैनंदिन हालचाल पूर्णतः विस्कळीत झाली आहे.
रेल्वे प्रशासनाने पर्यायी मार्ग म्हणून सरगम चौक रेल्वे बोगद्याचा पर्याय सुचवला असला, तरी पावसामुळे या बोगद्यात पाणी साचते, आणि वारंवार वाहतूक ठप्प होते. यामुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
सध्या पंढरपूरमध्ये फक्त दोनच बोगदे उपलब्ध असल्याने (डीवायएसपी कार्यालयाजवळील व सरगम चौक), त्यातील एक बंद झाल्याने संपूर्ण वाहतूक दुसऱ्या बोगद्यावर वळवली आहे. सरगम चौक परिसरात आधीच खड्डे व वाहतूक कोंडीची समस्या असल्याने, या मार्गावरचा भार वाढला असून शहरात येणाऱ्या भाविकांनाही अडचणीचा सामना करावा लागत आहे
रेल्वे विभागाने याबाबत नगरपरिषद, तहसील कार्यालय, एस.टी. महामंडळ आणि पोलीस प्रशासन यांना आधीच अधिकृत पत्राद्वारे माहिती दिली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्यामुळे नियोजनाचा अभाव दिसून येतो.
काम गरजेचे असले तरी जनतेला पर्यायी मार्ग सुलभ व सुरक्षित ठेवूनच रस्ता बंद करण्याचा निर्णय घेणे योग्य ठरले असते.
शहराच्या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण असलेल्या या रस्त्याच्या बंदीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्रशासनाने अधिक समन्वयपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे.