म्हसवड नगरपरिषदेमार्फत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात संपन्न
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (ता. माण, जि. सातारा) –प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त म्हसवड नगरपरिषदेतर्फे दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुख्याधिकारी श्री. डॉ. सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने काढलेल्या शासन परिपत्रकानुसार १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनानंतर नगरपरिषदेच्या वतीने हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच वारकऱ्यांनी पांढरे वस्त्र परिधान करून या सोहळ्यात सहभाग घेतला.

या प्रसंगी अप्पर तहसीलदार सौ. मीना बाबर, गावकरी भजनी मंडळ, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील वारकरी तसेच म्हसवड पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ व सर्व वारकरी तसेच म्हसवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पालखी सोहळ्यात कीर्तन, अभंग गायन, भजनी मंडळांचे गायन, महासंत श्री ज्ञानेश्वर महाराज व विठ्ठल रुख्मिणीया जयघोषासह गजर, टाळ-मृदुंग यांच्या सुरात भक्तिगीते असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले.

पालखी सोहळ्यात महिला कर्मचारी व सहभागी महिलांनी फुगड्या खेळून उत्साह वाढवला. नगरपरिषदेच्या परिसरातून सुरू झालेला दिंडी सोहळा संपूर्ण शहरात नगर प्रदक्षिणा घालून पुन्हा पालिका कार्यालयासमोर आला. त्यानंतर उपस्थित वारकरी, नागरिक व कर्मचारी यांच्याकडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची आरती होऊन सोहळ्याची सांगता झाली.

नगरपरिषदेमार्फत “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” या अभियानाशी संलग्नितपणे हा कार्यक्रम पार पडला. भक्तिगीतांच्या स्वरांतून संत परंपरेचा संदेश आणि स्वच्छतेचा संकल्प या दोन्हींचा सुंदर संगम या सोहळ्यात दिसून आला.
हा पालखी सोहळा केवळ धार्मिक सोहळा न ठरता संपूर्ण म्हसवड शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी ऐक्य, श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा महोत्सव ठरला.
मुख्याधिकारी श्री. डॉ. सचिन माने यांनी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेषत या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिलेले अधिकारी सागर सरतापे स्वच्छता निरीक्षक, रूपाली माडकर, कार्यालय अधीक्षक, पूनम जाधव,लेखापाल, श्रीधर रकटे, नगर रचना सहाय्यक, रूपाली शिंदे, कर निरीक्षक, आकाश पिसे, शहर समन्वयक, सुरज पवार, पाणीपुरवठा अभियंता, चैतन्य देशमाने,अभियंता, शिवराज भोसले,निसार मुल्ला, प्रवीण सुतार, शुभम चव्हाण तसेच या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित गावकरी भजनी मंडळ, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे वारकरी व पंचक्रोशीतील सर्व वारकरी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

