कोपर्डी हवेली, बनवडी, वडोली, निळेश्वर या गावांमधील शेतकऱ्यांच्या जनावरांना लंपी रोगाची लागण झाल्याने शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. लंपी हा एक संसर्गजन्य रोग असून तो जनावरांमध्ये त्वचेवर फोड येणे, पायाला सूज येणे, तसेच वैरण न खाणे अशा लक्षणांद्वारे आढळतो. हा रोग इतर जनावरांमध्ये वेगाने पसरू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
कोपर्डे हवेली येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सदाम मुल्ला यांनी सांगितले की, “लंपी रोग संसर्गजन्य असला तरी योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास जनावरांची प्रकृती सुधारते. परिसरातील दोन ते तीन जनावरांना या रोगाची बाधा झाली होती, मात्र योग्य उपचारामुळे त्यांची प्रकृती सुधारली आहे.”
शेतकऱ्यांना आवाहन करताना त्यांनी गोठ्याची स्वच्छता, जनावरांना सकस आहार आणि वेळेवर लसीकरणाच्या महत्त्वावर भर दिला. यासोबतच शेतकऱ्यांनी गोठ्यात नियमित धूर करावा व स्वच्छता राखावी, असेही त्यांनी सांगितले.
वडोली निळेश्वर येथील शेतकरी संजय पवार यांच्या खिल्लार जातीच्या गाईला प्राथमिक लागण झाली होती, मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार केल्याने तिची प्रकृती सुधारत आहे. शेतकरी वर्गातून लसीकरणाबरोबरच उपाययोजनांसाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्याची मागणी होत आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत आहेत आणि योग्य उपाययोजनांमुळे रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.