व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
अरुण जंगम म्हसळा – रायगड
रायगड जिल्हा म्हसळा तालुक्यातील शिक्षण विभागात मागील काही वर्षांपासून सावळा गोंधळ सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा आहेत तर इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या अनेक खाजगी संस्थांच्या शाळा आहेत.खाजगी संस्थांच्या हायस्कुल मध्ये संस्था चालकांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून शैक्षणिक नुकसान होत आहे.अनेक हायस्कुल मध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे.
म्हसळा तालुक्यात खरसई हायस्कुल मध्ये इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत १०७ विद्यार्थी शिक्षण घेत असून या सर्व विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी फक्त एकच शिक्षक कार्यरत असल्याचे समजते.मोठ्या लोकवस्तीच्या खरसई गावामध्ये सन १९८१ पासून विनय शिक्षक संस्था महाड यांचे न्यू इंग्लिश स्कुल खरसई हायस्कूल मध्ये इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत वर्ग आहेत.हायस्कुलचे कार्यक्षेत्र खरसई,मेंदडी,रेवली,गणेशनगर,बनोटी गावांतील विद्यार्थी आपले भवितव्य घडविण्यासाठी शिक्षण घेत आहेत.सद्यस्थितीला सन २०२२-२३ मध्ये ४ शिक्षक होते.यापैकी दि.३१ मे २०२३ रोजी २ शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत.त्यानंतर दि.३० जुन २०२४ रोजी आणखीन एक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत आता हायस्कुलमध्ये एकच शिक्षक कार्यरत असतात त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा देखील चार्ज आहे.हायस्कुल मध्ये क्लार्क देखील नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ग्रामस्थानी २ खाजगी शिक्षक नेमले आहेत त्यांचे मानधन ग्रामस्थ देतात.शिक्षकांची संख्या कमी असताना देखील हायस्कुलचा निकाल १००% लागला आहे.संस्थेच्या मालकीची इमारत नाही.डिजिटल व विज्ञान युगात हायस्कुल मधील शिक्षकांच्या जागांबाबत अशी अवस्था असेल तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे घडणार ? उद्याची सुजाण पिढी शैक्षिणक गुणवत्ता कशी काय धारण करणार हा देखील प्रश्न गुलदस्त्यात आहे. चौकट – विनय शिक्षण संस्थेने खरसई हायस्कुल बाबत योग्य ती खबरदारी घेतली नाही तर लवकरच हे हायस्कुल बंद झालेले दिसेल.हायस्कुलला शिक्षकांच्या जेवढ्या जागा मंजूर आहेत तेवढ्या जागांसाठी लवकारत लवकर शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी आमची मागणी आहे असे स्थानिक कमिटी चेअरमन परशुराम मांदाडकर यांनी सांगितले आहे.