महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना भावपूर्ण अभिवादन — माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांची मानवंदना
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड — प्रतिनिधी
म्हसवड येथील बौद्ध समाजमंदिरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न, संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांनी श्रद्धाभावाची दिमाखदार नोंद झाली. शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवांना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांनी हजेरी लावून डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. त्यांनी धम्मदीप जाळून, पंचशील पठणात सहभागी होत समाजमंदिरातील भाविकांना संबोधित केले.
नितिनभाई दोशी म्हणाले की,
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला न्याय, समता आणि बंधुता यांची अमूल्य देणगी दिली. त्यांच्या विचारांशिवाय भारताचा विकास शक्य नाही. त्यांच्या आदर्श मार्गावर चालणे म्हणजेच खरा अभिवादनाचा मार्ग आहे. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय आणि संधी मिळवून देणे हीच खरी बाबासाहेबांना वाहिलेली कृतिश्रद्धांजली आहे.”
कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, युवक मंडळांचे सदस्य उपस्थित होते. संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन, भिक्षू संघाचे मार्गदर्शन, सामूहिक ध्यान आणि बुद्ध वंदना अशा उपक्रमांनी वातावरण अधिक प्रेरणादायी बनले.
बौद्ध समाजाच्या वतीने माजी नगराध्यक्षांचे स्वागत करून त्यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण म्हसवड शहरात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सामाजिक सलोख्याचा आणि बदलाचा संदेश देण्यात आला.

