गणेशोत्सवानिमित्त माणकीत सर्वरोग व कर्करोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
इरफान मुल्ला
सोलापूर (माणकी ता. माळशिरस) प्रतिनिधी:
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, माणकी येथे गुरुवार दि. ४ सप्टेंबर रोजी सर्वरोग निदान व कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला गावकऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिराचे उद्घाटन माणकी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. किरण माने व स्त्रीरोग तज्ञ डॉ. मोनिका मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यानंतर तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित रुग्णांची तपासणी केली.

या शिबिरात स्त्रीरोग तज्ञ डॉ. मोनिका मिसाळ, दंतरोग तज्ञ डॉ. पोटे, बालरोग तज्ञ डॉ. संतोष माने-देशमुख, नेत्ररोग तज्ञ डॉ. कोळेकर, जनरल फिजिशिअन डॉ. महादेव खटाळ, डॉ. पूजा केमकर, डॉ. विकास मगर यांसारखे विविध तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.

शिबिरादरम्यान कर्करोग तपासणीसाठी तब्बल ४९ रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर इतर आजारांकरिता १८४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या माध्यमातून अनेक नागरिकांना मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळाली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा.आ.केंद्र माणकीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष माने-देशमुख यांनी मार्गदर्शन केले. तसेच समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, औषधनिर्माण अधिकारी, प्र.वै.अधिकारी, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक-सेविका व सर्व आशा स्वयंसेविका तसेच परीचर यांनी मोठे योगदान दिले.
गणेशोत्सवानिमित्त आयोजित हे शिबिर नागरिकांसाठी आरोग्यदायी ठरले असून भविष्यात अशा शिबिरांची संख्या वाढावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

