“बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानाच्या दहा वर्षांच्या पूर्णत्वाच्या निमित्ताने दहिवडी पोलीस ठाण्यामार्फत भव्य जनजागृती बाईक रॅली
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी, ता. ७ (प्रतिनिधी) –
“बेटी बचाओ, बेटी पढाओ” या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत जनजागृतीसाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत दहिवडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार, पोलीस भरती अकॅडमीच्या विद्यार्थिनी, तसेच शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी स्फूर्तीदायक वातावरणात “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या अभियानाच्या अनुषंगाने जनतेमध्ये जनजागृती केली. फ्लेक्स, बॅनर आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचा तसेच महिला सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
ही रॅली दहिवडी पोलीस ठाण्याच्या आवारातून सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गांवरून जात पुन्हा पोलीस ठाण्यात आली. यामध्ये महिलांनी “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा,” “स्त्री शिक्षण हा समाजाचा आधार,” “महिला सशक्तीकरण हीच खरी प्रगती” अशा घोषणा देत लोकांमध्ये जनजागृती केली.

रॅलीदरम्यान नागरिकांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी रॅलीला प्रोत्साहन देत टाळ्यांचा गजर केला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.


