व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
मुंबई, १०: सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात म्हसवड येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नवीन अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील प्रशासकीय सेवा अधिक सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या कार्यालयाच्या स्थापनेमुळे म्हसवड परिसरातील नागरिकांना महसूल विषयक कामकाजासाठी दहिवडी येथे जाण्याची गरज भासणार नाही.
सातारा जिल्ह्यातील माण तालुका डोंगराळ व दुष्काळग्रस्त क्षेत्र असून, दळणवळणाच्या अडचणींमुळे नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी दूरवर जावे लागत होते. या समस्येच्या पार्श्वभूमीवर म्हसवड येथे अपर तहसील कार्यालयाची स्थापना करणे गरजेचे ठरले. यासाठी शासनाने चार पदांची मंजुरी दिली आहे, त्यात अपर तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून आणि महसूल सहायक यांचा समावेश आहे.
या निर्णयानुसार म्हसवड, माडी, कुकुडवाड आणि वरकुटे-मलवाडी या महसुली मंडळांतर्गत ४७ गावे येतील. यामुळे या परिसरातील रहिवाशांना महसूल सेवांचा लाभ सहजपणे मिळू शकेल.