जनसुरक्षा नव्हे, सत्तासुरक्षा विधेयकविरोधात शिवतीर्थावर गाजला आक्रोश
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
सातारा :प्रतिनिधी
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी व विविध घटक पक्ष-समाजसंघटनांनी बुधवारी शिवतीर्थावर जाहीर आंदोलन छेडले. या वेळी आंदोलकांनी विधेयकाच्या प्रतीची होळी करून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), भाकप, माकप, समाजवादी पक्ष, भारिप, भारत जोडो अभियान, श्रमिक मुक्ती दल, जनआंदोलन संघर्ष समिती यासह अनेक संघटनांचा यात सहभाग होता. काँग्रेस कमिटी कार्यालयातून निघालेला मोर्चा पोवईनाक्याहून शिवतीर्थावर पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलकांनी “जनसुरक्षा विधेयक रद्द करा”, “ही जनसुरक्षा नव्हे तर सत्तासुरक्षा आहे”, “लोकशाहीला धोका मान्य नाही” अशा घोषणा देत वातावरण तापवले.

श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, राजकुमार पाटील, बाबुराव शिंदे, दिलीप बाबर, गोरखनाथ नलावडे, साहिल शिंदे, राजेंद्र शेलार आदींच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.
श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर म्हणाले, “या विधेयकावर राज्यभरातून तब्बल 13 हजार हरकती दाखल झाल्या आहेत. त्यातील नऊ हजारांहून अधिक हरकती रद्द करण्याच्या मागणीसाठी आहेत. सरकार संविधानिक मार्गाने आवाज उठवणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे. आता सामान्य नागरिकच या कायद्याविरोधात उभे राहतील.”

तर बाबुराव शिंदे यांनी स्पष्ट केले की, “या विधेयकामुळे शांततामय आंदोलन, मोर्चा, उपोषण किंवा सरकारी धोरणांवरील टीका देखील बेकायदेशीर ठरू शकते. हे जनसुरक्षा विधेयक नसून सत्तेची सुरक्षा करण्यासाठीच आणलेले कायदे आहे.”
या आंदोलनात डॉ. भारत पाटणकर,काँग्रेस चे जिल्हाअध्यक्ष रणजितसिंह देशमुख, राजकुमार पाटील, दिलीप बाबर, बाबुराव शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलनामुळे सातारा शहरात वातावरण चांगलेच तापले होते.

