सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये नव्या नर वाघाची नोंद; एकूण संख्या झाली सात

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड प्रतिनिधी :
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एका नव्या नर वाघाची अधिकृत नोंद झाली असून त्याला STR T9 असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. स्थानिक मार्गदर्शकांनी या वाघाचे नामकरण ‘शिलेदार’ असे केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरातील विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये वारंवार दिसून आला असून त्याचे फोटो व व्हिडिओ वन विभागाच्या नोंदीत जमा झाले आहेत.

सध्या T9 शिलेदार हा T5 ‘तारा’ या वाघिणीच्या क्षेत्रात तिच्या मागोमाग फिरताना आढळत आहे. त्यामुळे ताऱ्याच्या क्षेत्रात आता तीन नर वाघांची उपस्थिती झाली आहे.

सध्या सह्याद्रीतील वाघांची नोंद

T1 – सेनापती

T2 – सुभेदार

T3 – बाजी

T4 – चंदा

T5 – तारा

T6 – हिरकणी

T9 – शिलेदार

नव्या नोंदीमुळे सह्याद्रीतील वाघांची एकूण संख्या ७ झाली आहे.

ताऱ्याच्या क्षेत्रात तीन नरांची उपस्थिती

सध्या T5 (तारा) हिच्या अधिवासात T1 सेनापती, T2 सुभेदार आणि नव्याने दाखल झालेला T9 शिलेदार हे तीन नर वाघ फिरत आहेत. तारा कोणत्या नराची निवड करणार, याकडे वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.

क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी ही नोंद सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अत्यंत आनंदाची असल्याचे सांगितले. या घटनेमुळे सह्याद्रीतील जैवविविधता अधोरेखित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडणारे राधानगरी तसेच तिलारी-दोडामार्ग येथील जंगल कॉरिडॉर वाघांच्या स्थलांतर व प्रजननासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

डिसेंबर २०२४ मध्ये सावंतवाडी वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये ‘सह्याद्री कोकण टायगर’ (SKT-21) या तरुण नर वाघाचे प्रथम छायाचित्र टिपण्यात आले होते. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये तो दाजीपूर अभयारण्य परिसरात आढळला. जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये त्याची नोंद सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाली आहे.

वन्यजीव जीवशास्त्रज्ञ गिरीश पंजाबी (WCT) यांच्या मते, हा वाघ योग्य अधिवासाच्या शोधात स्थलांतर करत असून टायगर कॉरिडॉरची परिणामकारकता त्यातून पुन्हा स्पष्ट झाली आहे.

नव्या T9 ‘शिलेदार’च्या आगमनामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघसंख्येत वाढ झाली असून प्रकल्पाची पर्यावरणीय समृद्धी आणि कॉरिडॉर व्यवस्थेचे महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वन विभाग आणि स्थानिक वन्यजीव रक्षकांच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळाले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *