नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची घोषणा – कलावंतांसाठी सुवर्णसंधी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
मुंबई : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती मुंबई शाखेच्या वतीने आयोजित ‘नाट्य परिषद करंडक’ ही राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. नाट्यकलेचा जागर करण्याच्या उद्देशाने आणि शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी दिली.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील नाट्यकर्मी, हौशी कलावंत, महाविद्यालयीन विद्यार्थी व नाट्यशास्त्र विभागांतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून यावर्षीपासून ही स्पर्धा दरवर्षी नियमितपणे घेण्यात येणार असल्याचे परिषदेच्या कार्यकारी समितीने स्पष्ट केले आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी विविध जिल्ह्यांतील केंद्रांवर होणार आहे. यानंतर निवडक २५ एकांकिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार असून ती १५ ते १८ सप्टेंबर २०२५ दरम्यान मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा – माहीम येथे सादर होणार आहे. अंतिम फेरीत सहभागी कलावंतांसाठी विशेष नाट्य कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील रोख पारितोषिके पुढीलप्रमाणे :
▪️ प्रथम क्रमांक : ₹१,००,०००/-
▪️ द्वितीय क्रमांक : ₹७५,०००/-
▪️ तृतीय क्रमांक : ₹५०,०००/-
▪️ दोन उत्तेजनार्थ पारितोषिके : प्रत्येकी ₹१५,०००/-
▪️ दिग्दर्शन, लेखन, अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा- वेशभूषा आदी वैयक्तिक पारितोषिके ₹७०००, ₹५०००, ₹३०००/- अशी प्रदान केली जाणार आहेत.
प्रत्येक स्पर्धक संस्थेस रु. २०००/- मानधन आणि सहभागी कलावंत, तंत्रज्ञ यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रवेश फी रु. १०००/- ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेच्या प्रवेशाची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२५ सायंकाळी ७ वाजेपर्यंत असून, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. प्रवेश अर्ज व नियमावलीसाठी www.natyaparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांनी राज्यभरातील कलावंतांनी मोठ्या संख्येने या नाट्यमहोत्सवात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.