डिजिटल वीज मीटर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; १२ जून रोजी बोंबाबोंब आंदोलनाची चेतावणी
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (ता. माण, जि. सातारा) –
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांच्या घरी जबरदस्तीने डिजिटल वीज मीटर बसवले जात असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात पक्षाने येत्या १२ जून २०२५ रोजी अप्पर तहसील कार्यालय, म्हसवड येथे बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री. किशोरभाऊ भोजलिंग सोनवणे यांनी तहसिलदार माण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वीज कायदा २००३ च्या कलम ४७ (५) नुसार ग्राहकांना कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र्य आहे. मात्र वीज वितरण कंपनीकडून हे अधिकार डावलून गुपचूप पद्धतीने ग्राहकांच्या घरी डिजिटल मीटर बसवले जात आहेत, हे बेकायदेशीर आहे.
सोनवणे यांनी असा आरोप केला की, “ग्राहकांच्या घरी कोणी नसताना, कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने मीटर बदलले जात आहेत. ग्राहकांच्या परवानगीशिवाय हे मीटर बसवणे गैरकायदेशीर आहे आणि यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे.” त्यांनी असा दावाही केला की, नवीन डिजिटल मीटरमुळे विजेचे बिल सरासरीपेक्षा पाचपट जास्त येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर त्यांनी म्हसवड आणि नगरपंचायत हद्दीतील जबरदस्तीने सुरू असलेली मीटर बसवण्याची प्रक्रिया त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे. अन्यथा, नागरिकांना सोबत घेऊन कार्यालयावर मोर्चा व टाळेबंदी करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रति
उपविभागीय अभियंता, महावितरण, दहिवडी,अप्पर तहसीलदार, म्हसवड,पोलीस निरीक्षक, म्हसवड पोलिस ठाणे
कनिष्ठ अभियंता, महावितरण, म्हसवड यांना पाठवण्यात आल्या आहेत
या आंदोलनामुळे प्रशासन व पोलीस यंत्रणेपुढे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.