राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा परिषदेचा नांदेडमध्ये उत्साहात समारोप!
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
नांदेड – उध्दव सरोदे
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय, नांदेड येथे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आयोजित “इमर्जिंग पॅराडाइम अँड इनोव्हेशन्स इन योगा, फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सायन्सेस” या विषयावरील राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेत देशातील ८ राज्यांतील विविध विद्यापीठ व महाविद्यालयांमधील क्रीडा संचालक, प्राध्यापक, संशोधक व क्रीडा प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. परिषदेची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली.
उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, तर अध्यक्षस्थानी मा. डी.पी. सावंत (माजी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तसेच श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव) उपस्थित होते. प्राचार्या डॉ. विना पाटील यांनी परिषदेचे प्रास्ताविक मांडत महाविद्यालयाचा गौरवशाली इतिहास आणि परिषद आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली.
डॉ. मनोहर चासकर यांनी उद्घाटनपर भाषणात योगा आणि खेळ यांच्या माध्यमातून मानवी जीवनातील संतुलनाचे महत्त्व विशद केले. तर मा. डी.पी. सावंत यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
या परिषदेत योगातील नवनवीन प्रयोग, ताण-तणाव व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, क्रीडा क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर व शारीरिक-मानसिक स्वास्थ्यासाठी खेळाचे महत्त्व या विषयांवर चार सत्रांत सखोल चर्चा झाली.
प्रमुख साधन व्यक्तींमध्ये डॉ. अरविंद मलिक (कुरुक्षेत्र विद्यापीठ, हरियाणा), डॉ. रीना पुनिया (मणिपाल विद्यापीठ, जयपूर), डॉ. माधुरी सदगीर (मुंबई विद्यापीठ) आणि डॉ. व्ही. साई अभिनव (कर्नाटक विद्यापीठ) यांनी मार्गदर्शन केले.
परिषदेच्या पाचव्या सत्रात सहभागी प्राध्यापकांनी त्यांचे संशोधन लेख सादर केले. एकूण १२५ संशोधन लेख प्रकाशित करण्यात आले असून सहभागी सर्वांना पीअर रिव्ह्यू जर्नल व प्रमाणपत्र देण्यात आले.
समारोप सत्रात अध्यक्ष म्हणून मा. नरेंद्रदादा चव्हाण (कार्यकारिणी सदस्य, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी) उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अशोक महाजन (प्र-कुलगुरू, स्वा.रा.ती.म. विद्यापीठ) यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. चंद्रकांत बाविसकर, अधिष्ठाता (अंतरविद्याशाखा) यांनी सत्रास हजेरी लावली. परिषदेचे आयोजक सचिव डॉ. चरणजीतसिंघ महाजन (क्रीडा संचालक) यांनी सर्व मान्यवर, साधन व्यक्ती, सहभागी संशोधक, तसेच महाविद्यालयातील शिक्षकवर्गाचे आभार मानले.
समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. संपूर्ण परिषद यशस्वीरित्या पार पडण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने परिश्रम घेतले.
योगा, क्रीडा आणि नवसंकल्पनांचा संगम साधणारी ही राष्ट्रीय परिषद नांदेड शहरासाठी अभिमानास्पद ठरली.

