म्हसवडचे समाजसेवक व इंजिनिअर सुनील पोरे यांना नामदेव समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला असून, 1 डिसेंबर रोजी पुणे येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे.
सुनील पोरे यांनी म्हसवड व परिसरात अनेक लोकोपयोगी कामे करून समाजसेवेत मोलाचा वाटा उचलला आहे. दुष्काळी परिस्थितीत माणगंगा नदीला पाणी सोडण्यासाठी त्यांनी उपोषण केले तसेच सातारा-पंढरपूर महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी प्रखर आंदोलन केले. कोरोना काळातही पोरे कुटुंबीयांनी अहोरात्र मदतकार्य केले. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, अन्नदान करणे अशा मानवतावादी कार्यातून त्यांनी माणुसकीचा धर्म जपला.
श्री संत नामदेव शिंपी समाज परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून पोरे यांनी शिंपी समाजाची एकजूट घडवून आणली. महाराष्ट्र शासनाने नुकत्याच स्थापन केलेल्या शिंपी समाज महामंडळासाठीही पोरे यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत नामदेव व्हिजन फाउंडेशन, पुणे यांनी त्यांना नामदेव समाज भूषण पुरस्कार जाहीर केला आहे.
पुरस्कार सोहळा: हा पुरस्कार सोहळा 1 डिसेंबर रोजी पुण्यात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक संजय शेठ सासेलकर असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रकाश देवळे उपस्थित राहणार आहेत. नासपचे राज्याध्यक्ष संजयजी नेवासकर, सचिव अजय फुटाणे, मुख्यविश्वस्त राजेंद्र पोरे यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
सुनील पोरे यांच्या कार्याने म्हसवडचे नाव राज्यभर गाजले असून, त्यांच्या यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण आहे