विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माण-खटाव तालुक्यातील विकासकार्य आणि लोकहिताच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून, वरकुटे मलवडी येथील मुस्लिम समाज बांधवांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. विविध क्षेत्रांतील सुधारणा, दुष्काळमुक्तीची दिशा आणि समाजसेवेची तळमळ या भूमिकांवर आधारित जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाची आस्था ठेवून मुस्लिम समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला.
या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात आमदार जयकुमार गोरे यांनी पक्षात नव्याने सामील झालेल्या सर्वांचे स्वागत केले. “विकासाच्या प्रक्रियेत समाजाच्या सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असून, या बांधवांचा विश्वास आमच्या कार्याला बळ देणारा आहे,” असे गोरे म्हणाले. आगामी काळात विकासाचे धोरण ठरवताना सर्वांगीण प्रगतीसाठी हा निर्णय मोलाचा ठरेल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाला म्हसवड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अकीलभाई काझी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. काझी यांनी या निर्णयाचे स्वागत करत सांगितले की, “जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली माण-खटाव तालुक्याच्या औद्योगिक, हरित आणि शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने मोठी पाऊले उचलली जातील.”
उपस्थितांना संबोधित करताना जयकुमार गोरे यांनी समाजबांधवांना पुढील कार्यात जोमाने सहभागी होण्याचे आवाहन केले. “आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे काम प्रभावीपणे करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन सहकार्य करावे,” असे ते म्हणाले.