पालिका निवडणूक दहशतमुक्त व पारदर्शक व्हावी – अनिल देसाई

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड दि. १८ :
            म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाकडून पक्षपातीपणाचे संकेत दिसत असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केला असून ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीपासून मुक्त, पारदर्शक आणि लोकशाही मूल्यांस अनुरूप पार पाडावी, अशी मागणी त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई तसेच जिल्हाधिकारी सातारा व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

       या निवडणुकीत सामान्य मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या दहशतीशिवाय स्वातंत्र्याने आपला प्रतिनिधी निवडण्याचा घटनादत्त अधिकार वापरता यावा, यासाठी स्पष्ट आणि कठोर प्रशासनिक भूमिका आवश्यक असल्याचे देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. निवडणूक कार्यालयाचा मुख्य दरवाजा अधिकृत वेळेनंतर बंद करण्यात आला असतानाही नंतर काही जणांना प्रवेश देण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला असून, त्या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज तातडीने तपासण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

        यावेळी एका सरकारी कर्मचाऱ्याची या ठिकाणी अधिकृत नियुक्ती नसताना त्याची दिवसभर उपस्थिती आढळल्याचा दावा देसाई यांनी केला. तो व्यक्ती केवळ प्रशासनावर दबाव आणण्यासाठी तैनात असल्याचा संशय व्यक्त करत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी नोंदवली. अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाखाली किंवा पूर्वग्रहदूषित भूमिकेत न राहता समानता व पारदर्शकतेने निवडणूक प्रक्रिया राबवावी, अन्यथा लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

      या आरोपांबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी मोहिते यांनी प्रतिक्रिया देताना तक्रारीची नोंद घेतली असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार असल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी नियुक्त अधिकृत व्यक्तीव्यतिरिक्त इतर कोणालाही निवडणूक कार्यालयात प्रवेश न देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. फुटेज तपासणीनंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *