मेरी माता स्कूलच्या कु. आसावरी मेळावणे हिचे रायफल शुटिंगमध्ये दैदीप्यमान यश – तीन पदकांची कमाई करून म्हसवडचे नाव उज्ज्वल
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख
गोंदवले खुर्द (प्रतिनिधी)
मेरी माता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड येथील इयत्ता १० वीमध्ये शिक्षण घेणारी कु. आसावरी सतीश मेळावणे हिने राज्यस्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेत अत्युच्च यश संपादन करत संपूर्ण म्हसवड शहराचे नाव उज्वल केले आहे.
महाराष्ट्र रायफल असोसीएशन यांच्या वतीने मुंबई (वरळी) येथे नुकतीच पार पडलेली २८ वी कॅप्टन एस. जे. इझेकल राज्यस्तरीय रायफल शुटिंग स्पर्धा ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. या स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर रायफल पीप साईट प्रकारात कु. आसावरीने सब युथ, युथ आणि ज्युनिअर या तिन्ही वयोगटांमध्ये सहभाग नोंदवत एकंदर ४०० पैकी ३९१ गुण मिळवत २ सुवर्ण पदके 🥇🥇 व १ रौप्य पदक 🥈 पटकावले.
असावरी मागील तीन वर्षांपासून शालेय शिक्षणासोबतच या क्षेत्रात प्रचंड मेहनत घेत असून दररोज नियमित सराव व योग्य आहार-विहार यामुळे तिची शारीरिक आणि मानसिक ताकद वाढत गेली. एका वेगळ्या स्वप्नाचा पाठपुरावा करत ती आज राज्य पातळीवर पोहोचली आहे.
या यशामागे तिच्या प्रशिक्षक मा. श्री. आकाश गुजरे सर यांचे मार्गदर्शन आणि आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकी यांचे प्रेमळ पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे.
या अपूर्व यशाबद्दल म्हसवड पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. मा. अक्षय सोनवणे, मेरी माता शाळेचे प्राचार्य फादर सनु, तसेच शिक्षक सादिक शेख सर यांनी कु. आसावरीचे तसेच प्रशिक्षक आकाश गुजरे यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिस्तबद्ध जीवनशैली, चिकाटी, कुटुंबाचे सहकार्य व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या सगळ्यांचा योग्य समतोल असावरीने राखला असून तिच्या या यशामुळे म्हसवड शहरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ती प्रेरणास्थान ठरत आहे.