म्हसवडमध्ये दमदाटी करून पैसे व चैन हिसकावली; आरोपी फरार — पोलिसांचा तपास सुरू
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड | 6 डिसेंबर 2025
म्हसवड शहरात काल रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात एका तरुणाने दारूच्या नशेत दमदाटी, मारहाण, शिवीगाळ करत नागरिकाकडून रोख रक्कम आणि चांदीची चैन हिसकावून पसार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी निलेश जालिंदर पिसे (वय 40, रा. माळीगल्ली, म्हसवड) हे आपल्या पुतण्यासह सार्वजनिक शौचालयाजवळ रात्री सुमारास 9 वाजता गेले असता मुसा सिकंदर नदाफ हा तेथे अचानक येऊन दारू प्यायची आहे म्हणून पैसे मागू लागला. निलेश याने नकार दिल्यावर त्याला कानाखाली मारहाण करत दमदाटी केली आणि 1500 रुपये रोख तसेच गळ्यातील चांदीची चैन हिसकावून घेत पळ काढला.
दरम्यान, आवाज ऐकून भाचा अजिंक्य विधाते घटनास्थळी धावला. त्याने आणि देवराज पिसे यांनी मुसा नदाफ याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांनाही शिवीगाळ व धमक्या देत हात झटकून अंधाराचा फायदा घेत फरार झाला.
तत्काळ शोध घेऊनही आरोपी सापडला नसल्याने निलेश पिसे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी BNS 119(1), 115(2), 352, 351(2), 355 अनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली. अधिक तपास HC1796 एन. एन. पळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

