उंब्रज परिसरात स्मार्ट मीटर बसवण्यास मनसेचा विरोध; महावितरण विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
उंब्रज प्रतिनिधी:
उंब्रज व परिसरातील नागरिकांच्या तक्रारींचा गंभीर विचार करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले. उंब्रज महावितरण विभागाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवू नयेत, अशी ठाम मागणी यामधून करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांत तीव्र नाराजी आहे. मनसेच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अनेक ठिकाणी महावितरणकडून “डिजिटल मीटर उपलब्ध नाहीत” असे सांगून ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. काही ठिकाणी नागरिकांना चुकीची माहिती देऊन त्यांना स्मार्ट मीटर बसवण्यास भाग पाडण्यात येत आहे. याला जोरदार विरोध नोंदवत मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, “स्मार्ट मीटर हा ऐच्छिक विषय असून त्यासाठी सक्ती करता कामा नये.”
या निवेदनात, महावितरण विभागाने याआधी उंब्रज व परिसरातील गावांमध्ये जे स्मार्ट मीटर बसवले आहेत, ते ८ दिवसांच्या आत काढावेत व त्याऐवजी डिजिटल मीटर बसवावेत, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. तसे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यातून होणाऱ्या नुकसानीस महावितरण प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
उंब्रज महावितरण कार्यालयात अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार येत आहेत. एवढेच नव्हे तर, महावितरण आवारात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासाची शासकीय सोय असूनही, ते तेथे राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांच्या तक्रारी वेळेवर सोडवल्या जात नाहीत आणि अनेकवेळा गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर श्री. रणजीत कदम – तालुका अध्यक्ष, श्री. विजय वाणी – शहर अध्यक् श्री. अमोल सुभाष कांबळे – सातारा जिल्हा सचिव, श्री. शिवराज जाधव, श्री. सुमित भिंगारदेवे, श्री. रमेश पाटील – मनसे कार्यकर्ते लिपिक – श्री. विमल वज आदी मनसे कार्यकरत्याच्या सह्या आहेत