वीरगाथा स्पर्धेत राज्यात प्रथम येणाऱ्या मुद्रा जाधवचा आमदार मनोज दादा घोरपडे व विनायक बाबा भोसले यांच्या हस्ते गौरव
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
उंब्रज, ता. कराड:
महाराष्ट्र शासनाच्या वीरगाथा प्रकल्पांतर्गत आयोजित स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली, उंब्रज (ता. कराड) येथील विद्यार्थिनी कुमारी मुद्रा कावेरी सचिन जाधव हिचा नुकताच सन्मान करण्यात आला. कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे आणि विनायक बाबा भोसले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कृष्णा विश्व विद्यापीठ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कै. गणपत मारुती गोळे यांच्या स्मरणार्थ महाशिवरात्रीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर व महाप्रसाद २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान मुद्रा जाधवच्या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यात आला.
राज्यभर राबविण्यात आलेल्या “वीर शौर्य गाथा” या उपक्रमात मुद्रा जाधव हिने उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये शूर वीरांच्या प्रेरणादायी कथा रुजवणे व नागरी सजगतेची भावना निर्माण करणे हे होते. तिच्या या यशाबद्दल यापूर्वी २६ जानेवारी रोजी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्तेही विशेष सन्मान करण्यात आला होता.
तसेच, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येऊन संचालक यांच्या हस्ते मुद्रा जाधव हिला प्रमाणपत्र, ट्रॉफी व पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
या विशेष कार्यक्रमास जयेश गोळे, रुपेश गोळे, दिगंबर भिसे, अभिजीत जाधव, बाळासाहेब ढवळे, सचिन जाधव, दत्तात्रेय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच समाजातील विविध प्रतिष्ठित व्यक्तींनी मुद्रा जाधव हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिला शुभेच्छा दिल्या.
मुद्रा जाधव हिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, तिच्या कर्तृत्वाने अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.