म्हसवड आठवडी बाजार की दुचाकींचा आगार? – वाहतूक कोंडी, पाकिटमारी आणि गर्दीने व्यापारी व ग्राहक हैराण
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड, दि. २९ (प्रतिनिधी)
माण तालुक्यातील म्हसवड शहरातील बुधवारी होणारा आठवडी बाजार हा पंचक्रोशीतील एक अत्यंत महत्त्वाचा बाजार मानला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या बाजाराचे स्वरूप बदलल्याचे चित्र दिसते. व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या दुचाकींच्या अतिवापरामुळे बाजारपेठेचे रस्ते, गल्लीबोळ आणि मुख्य प्रवेशमार्ग अक्षरशः दुचाकींनी तुडुंब भरले आहेत. परिणामी बाजारपेठ “आठवडी बाजार” न राहता “दुचाकींचा आगार” बनली आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
बाजारपेठेतील दुकाने आणि त्याच ठिकाणी लावलेल्या दुचाक्यांमुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. महिलांना बाजारातून वाट काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून गर्दीचा गैरफायदा घेत पाकिटमारीसारख्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
बाजारदिवशी एस.टी. बस स्थानक ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांमध्ये दररोज वादविवादाचे प्रसंग घडतात. पोलीस प्रशासन आणि नगरपालिका एकमेकांवर जबाबदारी टाकत असून नागरिक मात्र यामध्ये भरडले जात आहेत.
बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना देखील व्यवसाय करताना अडचणी येत आहेत. दुचाक्यांमुळे दुकानदारांपुढे ग्राहकांना जागा मिळत नाही. यामुळे उलाढालीवरही परिणाम होत असल्याचे तसेच दुचाकी मालकाला माझ्या दुकानासमोर गाडी लावू नको म्हटल्यावर तो शिव्या देऊन मारामारीला तयार होतो त्यामुळे विनाकारण वाद निर्माण होतो असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
यासाठी उपाय म्हणून
बाजारदिवशी चारचाकी आणि दुचाकींना प्रवेश बंदी करावी
वाहने बाजारपेठेच्या बाहेरील पार्किंग जागांमध्येच लावण्याची सक्ती करावी
पोलीस आणि पालिका प्रशासनाने संयुक्त नियोजन करून बाजारात शिस्त आणावी
स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील जागरूकता दाखवून सहकार्य करणे आवश्यक
सध्याचा आठवडी बाजार परिसर व्यापारी आणि नागरिकांच्या गर्दीला पुरेसा नसून बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना दुकाने लावण्यासाठी जागाच मिळत नाही. जर बाजारातून दुचाक्या बाहेर काढल्या तर व्यापारी आणि ग्राहक दोघांसाठीही अधिक मोकळ्या जागेचा फायदा होणार आहे, असे व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे मत आहे.
म्हसवड आठवडी बाजाराचे महत्त्व लक्षात घेता बाजारात वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग, पार्किंगसाठी निश्चित क्षेत्र आणि पोलीस-पालिका यांचे समन्वय आवश्यक आहे. अन्यथा वाढती गर्दी, चोरट्यांच्या घटना आणि व्यवसायावर होणारा परिणाम यामुळे भविष्यात बाजारपेठेचे महत्त्व कमी होण्याची भीती आहे.